शौर्यगाथा- हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे.
═══⊰T⊱✧❂✧⊰B⊱═══
जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत: चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला.....
पत्रात ते लिहीतात, त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीर मरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.
हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतु या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.
या शुरवीराच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांचा एकुलता एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.
तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खुप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहीली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.
शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले... “तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात... तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युट ला प्रतिसाद दिला असता..! ”
"नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”
“मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमधील त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरता पूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही..... ” तो काही क्षण बोलायचं थांबला .....
शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “मला सांगा... जे काही मनात असेल ते कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा... मी रडणार नाही.....”
“मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर... पण मी ही रडायला नको ना ....” तो सैनिक पुढे म्हणाला....
“त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गन ने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमचे हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेड च्या इतर सैनिकांची कुमक येण्यात विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग .... ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.
"पुढे काय झालं..?" शिक्षकाने विचारणा केली...
सैनिक पुढे म्हणाला, "मी म्हणालो, "त्यांचा गोळीबार चालूच राहिल... वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही... मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या."
मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रू च्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहीले व म्हणाला ‘तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत.... आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,' आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकर च्या दिशेने पळत सुटला."
“पाकिस्तानी हेवी मशीन गन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
“सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला.
मी आपल्या वरीष्ठांना तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली, परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगीरीवर मला पाठविण्यात आले."
“कदाचित मला या शूरविराला त्याच्या अंतीम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहीली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. " आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.
शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मुक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभिर्याने पाहिले आणि सैनिकाने ही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.
शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली., त्याच्या वीर मृत्यूची बातमी..."
“आता तो सदरा कोण घालेल... जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा या ठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती, परंतु आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या."
त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.
कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते जय हिंद ।
आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे ......
कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.
हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.
हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.
माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.
या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.
हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे.
(मुळ इंग्रजी भाषेत असलेल्या या लेखाचा मी केलेला स्वैर अनुवाद. आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल नाही - मा. अविनाश जाधव अधिकृत Facebook Public Group)
Yogesh Ramakant Swami यांच्या वाल वरून
जय हिंद...जय महाराष्ट्र
(This story is being shared by many people to us on social media platforms and we thought that it should reach to more people. Hence We are publishing here with the BIG THANKS to UNKNOWN WRITER / AUTHOR.)
Comments
Post a Comment